धाराशिव (प्रतिनिधी)- शाळकरी मुलीला अश्लील क्लिप दाखवणाऱ्या धाराशिवच्या गवळीवाडा शिक्षक कॉलनीतील नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 10 साक्षीदार तपासण्यात आले.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांच्या माहितीनुसार, शहरातील एका शाळेसमोर शाळा सुटल्यानंतर एक मुलगी 5 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी ऑटोरिक्षाची प्रतिक्षा करत होती. तेव्हा उमाकांत महाबोले आला. त्याने मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून मुलीला मैदानावर नेत लैगिंक छळ केला. हा प्रकार मुलीने आजीला सांगितला. आजीने 7 फेब्रुवारी 2019 रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मुलीने केलेल्या वर्णनाप्रमाणे उमाकांत गिरीधर महाबोले (रा. शिक्षक कॉलनी, गवळीवाडा, धाराशिव) याला अटक केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. यु. जाधव यांनी आरोपींविरूध्द तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. अंतिम सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर झाली. साक्षी पुरावा, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून उमाकांत महाबोले याला सहा महिने सक्त मजुरी, दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.