मुरूम(प्रतिनिधी)- केसरजवळगा, ता. उमरगा येथील जि. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन संगणक कक्षाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजीज शेख, मुख्याध्यापक श्रीकांत जवळेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. 9) रोजी करण्यात आले. शाळेला जिल्हा परिषदेमार्फत सात संगणक प्राप्त झाले होते. सदर संगणक कक्ष सर्व सोयीने युक्त असल्याने मुलांना नवनवीन बाबी शिकण्यासाठी सोयीचे होणार आहे. सध्याचे युग हे संगणकाचे असल्याने प्राथमिक शाळेतच आता हे शिकण्यास मिळत असल्याने मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. नवीन पिढीसाठी संगणक साक्षर असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. गावाची शाळा बदलत असल्याचे पाहून शाळेसाठी जे-जे हवे ते सहकार्य करू, अशी ग्वाही उपाध्यक्ष अजीज शेख यांनी दिली. ग्राम पंचायतकडून शाळेला क्रीडा साहित्याची यादी द्यावी व तात्काळ सर्व क्रीडा साहित्य देण्याचे आश्वासन माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमोल पटवारी यांनी दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बालाजी डिगोळे, जयपालसिंग राजपूत, गैबूशा मकानदार, पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी भोसले तर आभार अजीज शेख यांनी मानले.        

 
Top