धाराशिव (प्रतिनिधी)- 20 वर्षाची समृद्ध परंपरा असणारा व सालाबाद प्रमाणे महिलादिना निमित्त साजरा होणारा रंगारंग बहारदार आणि महिलांच्या सुप्त गुणांना संधी देणारा 'सप्तरंग 2024 ' हा कार्यक्रम धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात अतिशय चैतन्यमयी आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडला.

श्री धारासूरमर्दिनी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन संस्थापक अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, फेडरेशन माजी अध्यक्षा विनिता कुलकर्णी, संगीता काळे, विद्यमान अध्यक्षा डॉ. रेखा ढगे,   सर्व कार्यकारिणी सदस्य व मानद सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. फेडरेशन ग्रुपमधील सदस्य व सर्वांची मैत्रीण स्व.मंजुषा कोकीळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू मुलीस 25000 रु. आर्थिक मदत दरवर्षी   देण्यात येते, ती त्यांची कन्या मीरा कोकीळ -ब्रह्मपुरीकर हिच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात 60+असलेल्या यंग सासू ग्रुपच्या अवध मे आये राम या गाण्याच्या नृत्याने झाली! आणि एकापेक्षा एक नृत्याचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सादरीकरणातील विविधता.

मराठी - हिंदी - तामिळ गाण्याचे फ्युजन, पोवाडे, देवीचा गोंधळ, भारूड, मंगळगौरी, घुमर  ,सर्वधर्म समभाव दर्शविणारी कब मिलेगे शाम ही नाटिका, सोशल मीडिया हे मोबाईलचे वेड असणाऱ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारी नाटिका, राम जन्म ते वनवासातून परत येण्यापर्यंतचा प्रवास नृत्य गीतातून अतिशय कल्पकतेने केलेले सादरीकरण. सहेली ग्रुप, यारी ग्रुप, ड्यझलिंग ग्रुप यांची फ्युजन गाणी कोणत्याही प्रकारचे मेकअप किंवा ड्रेसिंग न करताही टाळ्याच्या कडकडात सादर झाली हे एक वैशिष्ट्य. 90ची गाणी, मराठी गाण्यांनी धमाल उडवली. फेडरेशन अध्यक्षा डॉ. रेखा ढगे यांचे 3-3 नाटिका मध्ये सहभाग हे ही एक वैशिष्टय. प्रेक्षकांसाठी अधून मधून प्रश्न विचारून सरप्राईझ गिफ्ट देऊन कार्यक्रमाची रंगत  नीता कठारे यांनी वाढवली हे आणखीन एक वैशिष्टय. तर स्पर्धा परीक्षण अनुराधा तोडकरी व दमयंती साळवी यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव उज्वला मसलेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली देशपांडे व अंजली महाजन यांनी केले. फेडरेशचा कोष कोषाध्यक्ष माधवी भोसरेकर यांनी  सांभाळला. या कार्यक्रमात चौदा  मंडळे व 9 ग्रूपचा सादरीकरणात  सहभाग होता. कार्यक्रमास 1500 महिलांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या शेवटी फेडरेशन च्या वतीने काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये वीरशैव महिला मंडळ व कालिका देवी प्रतिष्ठान लकी विनर ठरले. तर ग्रुप मधील लकी विनर नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन ग्रुप ला 501 रु चे बक्षीस देण्यात आले.         एकंदरीत 'सप्तरंग 2024 ' हा रंगतदार, बहारदार, वैशिष्टयपूर्ण असा कार्यक्रम झाला.


 
Top