धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील केशेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 चा सांगता समांरभ निमित्त गव्हाण पुजन कारखान्याचे संचालक अतुलसिंग बायस यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन विलास ऊर्फ हनुमंत भुसारे होते.

सांगता समारंभ कार्यक्रमाचेवेळी प्रस्तावीकपर भाषणात कारखान्याचे संचालक ॲड. चित्राव गोरे यांनी चालु हंगाम पार पाडणेकरीता पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याची कमतरता. तसेच ऊस तोडणी, वाहतुक यंत्रणेच्या बाबतीत आलेल्या अडचणी सांगुन पुढील हंगामात देखील पाण्याच्या कमतरतेमुळे नवीन लागवडी कमी होणार आहे. तसेच खोडवा ऊस टिकवणे कठीण होणार आहे. परंतु अशा काळातही खोडवा ऊस जोपासणे गरजेचे आहे. दरम्यानच्या काळात खोडवा ऊस जोपासणेकरीता खोडवा व्यवस्थापण कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या शेतकरी महिला शेती करतात त्यांना कारखान्याच्या महिला शेतकी मदतनीस यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. तसेच पुढील हंगामात ऊस उत्पादकांची गैरसोय होवु नये याकरीता पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरती करणेत येणार ॲड. चित्राव गोरे यांनी सांगितले. गळीत हंगाम 2023-24 मध्ये शेवटपर्यंत ऊस तोडणी कामगार व वाहतुक ठेकेदार यांचे कौतुक केले व आभार मानले.

कार्यक्रमाचेवेळी मार्गदर्शनपर भाषणात कारखान्याचे व्हा. चेअरमन विलास ऊर्फ हनुमंत भुसारे यांनी अवर्षण प्रवण परिस्थितीमुळे व ऊस तोड, वाहतुक यंत्रणा भागातील इतर कारखाने व गुळ पावडर कारखाने यांचे अमिषाला बळी पडुन निघुन गेल्यामुळे कारखाना कार्यक्षमतेनुसार चालला नाही. त्यामुळे अपेक्षित गाळप झाले नाही. ऊस तोडणी यंत्रणेची संख्या कमी होत असल्याने कारखाना व्यवस्थापनाने मालक तोडीचा निर्णय घेतला होता, वास्तवीक परिस्थिती बघता त्यास ऊस उत्पादक सभासदांनी चांगला प्रतिसाद देवून मालकतोड करुन ऊस गाळपास दिला. परंतु चालु हंगामात झालेल्या चुका पुढील हंगामात सुधारणेत येतील अशी ग्वाही भुसारे यांनी दिली. तसेच हंगामामध्ये ऊस तोड, वाहतुकीचे चांगले काम केल्याबद्दल ठेकेदारांना बक्षीस वाटप करणेत आले. कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व ऊस तोड, वाहतुक यंत्रणा यांचे सर्वांचे सहकार्याने हंगामात उच्चांकी गाळप करुन हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे नमुद केले. ॲड. निलेश पाटील यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, राजर्षी शाहू ट्रस्टचे विश्वस्थ, सर्व ऊस उत्पादक, ऊस तोडणी, वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे आभार मानले.


 
Top