धाराशिव (प्रतिनिधी)-नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे धोरण थोडेसे लवचिक असले तरी ते विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ करणारे आहे. असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुर येथीलअंतर्गत गुणवता हमी कक्षाचे समन्वयक तथा माजी प्र.कुलगुरू  प्रो. डॉ.गौतम कांबळे यांनी प्रतिपादन केले.

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आव्हाने आणि उपाय या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. गौतम कांबळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की,या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या कलागुणांमध्ये वाढ करणे शक्य होते. त्याच्या आवडीनिवडीनुसार तो विषय ठेवून त्याचा अभ्यास करू शकतो. असे असले तरी काही अल्पशा प्रमाणात याचे संभाव्य तोटे देखील असू शकतात. असे ते म्हणाले.

तर कार्यशाळेत दुसरे मार्गदर्शक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रो.डॉ.प्रभाकर कोळेकर हे लाभले होते. त्यांनी कौशल्य विकास आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की ,बदल हा काळाचा नियम आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदलले पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यामुळे भावी पिढीसाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

   सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक व साहित्यिक युवराज नळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी  कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ.सावता फुलसागर, सूत्रसंचालन डॉ.अरविंद हंगरगेकर तर आभार डॉ.दत्तात्रय साखरे यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top