तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात वेगवेगळ्या ठिकाणी मावेजा कमी-जास्त दराने दिला जात आहे. कुठे पावणेतीन लाख तर कुठे पाच ते सात लाख दराने मावेजा दिला जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाची ही दडपशाही थांबविण्यासाठी शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांच्या काबीज केलेल्या जमिनीला योग्य भाव मिळालाच पाहिजे. म्हणून शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला हातात दांडकं घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा रेल्वे संघर्ष समिती आणि शेतकरी कामगार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना मावेजात तफावत होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दि.6 फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रविंद इंगळे बोलत होते. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम अमृतराव, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन गावडे, उपाध्यक्ष विकास तांबे, सचिव रौफ शेख यांच्यासह तुळजापूर, धाराशिव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन गावडे, शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम अमृतराव यांचीही भाषणे झाली. आंदोलनानंतर तहसिलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, भागवत नेपते, कल्याण भोसले, उत्तम अमृतराव, बबन गावडे,गुरुदास भोजने, अभय साळुंके, धनाजी पेंदे, शहाजी सोमवंशी, राजाभाऊ हाके, शाहुराज चव्हाण, सुदर्शन झाडपिडे, बापू झाडपिडे, शंभुराजे पेंदे, हणमंत पेंदे, अनिल हंगरगेकर, अशोक साळुंके, वल्लभ कदम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top