धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकरी राजेंद्र विठ्ठलप्रसाद शुक्ला यांनी खाजगी सावकार नरहरी केरबा शिंदे, महादेव नरहरी शिंदे, दादा नरहरी शिंदे व विनायक नरहरी शिंदे सर्व रा.वाखरवाडी ता.कळंब जि.धाराशिव यांच्याकडून खाजगी सावकारी व्याजाने पैसे घेतले व सदर पैशाला तारण म्हणुन मौजे डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव येथील जमीन सर्व्हे नं. 3/अ/1 या पैकी मधली क्षेत्र 1 एकर (40.47 आर) आकार 2 रु. 48 पैसे ही जमीन तारण म्हणुन खरेदीखत नं.65/2001 ने दि.27/04/2001 रोजी खाजगी सावकार नरहरी केरबा शिंदे व महादेव नरहरी शिंदे यांच्या नावे करुन दिले. 

तसेच मौजे डिकसळ ता.कळंब जि.धाराशिव येथील जमीन सर्व्हे नं.3/अ/1 या पैकी उत्तर बाजुचे क्षेत्र 1 एकर (40 आर) आकार 2 रु 42 पैसे ही जमीन तारण म्हणुन खरेदीखत नं.106/2001 ने दि.13/07/2001 रोजी खाजगी सावकार दादा नरहरी शिंदे व विनायक नरहरी शिंदे यांच्या नावे करुन दिले होते. सदरील खाजगी सावकार हे शेतकऱ्याने पैसे परत करुनही जमीन परत नावावर करुन देत नव्हते म्हणुन शेतकरी राजेंद्र विठ्ठलप्रसाद शुक्ला यांनी ॲड.धर्मराज नवनाथ सोनवणे यांच्यामार्फत सदर सावकारा विरुद्ध मे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव यांच्या न्यायालयात सावकारकीची तक्रार दाखल केली. 

त्यामध्ये मे. न्यायालयाने दोन्ही बाजुचे पुरावे ऐकुन घेतले व मे. न्यायालयासमोर आलेल्या संपुर्ण पुराव्यावरुन सदरील झालेले दोन्ही खरेदीखते ही सावकारकीतुन झाली असल्याचे सिद्ध झाले. तसेच ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे धाराशिव यांनी केलेल्या युक्तीवादावरुन मे. न्यायालयाने दि.02/02/2024 रोजी निकाल देउन सदरची सावकारकीतुन झालेली दोन्ही खरेदीखते रद्दबातल करण्याचा आदेश केला. त्यामुळे शेतकऱ्याची जमीन ही खाजगी सावकारकीच्या कचाटयातुन सुटून शेतकऱ्याला न्याय मिळाला. शेतकऱ्याच्या वतीने ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे धाराशिव यांनी काम पाहिले व त्यांना ॲड.सचिन.डी.कांबळे यांनी सहकार्य केले.

 

 
Top