धाराशिव (प्रतिनिधी)- वर्तमान काळातही सत्ताधारी पक्ष हा इतर पक्षातील नेत्यांना विविध मार्गाने खेचून घेत आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना कांही वेळ संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. परंतु वास्तवात वातावरण असे आहे की सामान्य कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे विविध ठिकाणच्या विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी खचून न जाता कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी जोमाने  काम करावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा डॉ.स्मिता शहापुरकर यांनी केले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा  ऐतिहासिक पक्ष असून पक्षाच्या वैचारिक राजकीय भूमिकेच्या आधाराने एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बहरलेला आहे. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता या संविधानिक मूल्यांच्या आधाराने पक्षाचे काम चालते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडेच आहे. 

काँग्रेस पक्ष कधीही खोटी स्वप्ने, खोटी आश्वासने देऊन भुरळ पाडत नाही. लोकांची फसवणूक करण्याचे काम या पक्षाने कधीही केले नाही. त्यामुळेच लोकांच्या विश्वासावर हा पक्ष प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिला आहे. सत्तांतरे होतात, काही बदल होतात तेंव्हा पक्ष सोडून जाण्याचे प्रमाण सगळीकडे दिसून येते, अशी परिस्थिती अनेक वेळा काँग्रेसवर ओढवली आहे. पण तरीही लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम कमी झालेले नाही. पक्षाने अडचणीच्या काळात नवा मार्ग काढत आपली विचारधारा आणि स्थान कायम राखले आहे. पक्षाचा इतिहास आणि वैचारिक राजकीय भूमिका या भक्कम पायावर धाराशिव जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास डॉ स्मिता शहापूरकर  यांनी व्यक्त केला आहे.


 
Top