धाराशिव (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँडबाजा लावून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी यावेळी दिला.

आंदोलनानंतर मागण्याचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांकडे एफआरपीचे 90 कोटी रुपये थकीत आहेत. साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाळपासाठी दिलेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याचे स्पष्ट होत असून साखर कारखाने दर पंधरा दिवसाला साखर आयुक्त कार्यालयाला सादर करीत असलेल्या एफआरपीच्या माहितीविषयी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे साखर आयुक्तांचे अशा प्रकारांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे.

साखर सहसंचालकांकडील आकडेवारीनुसार 15 फेब्रुवारी 2024 अखेर धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याकडे 28.29 कोटी, भैरवनाथ (सोनारी) 20.64 कोटी, लोकमंगल माऊली 13.46 कोटी, भैरवनाथ (तेरणा) 18.40 कोटी, गोकुळ शुगर 12.54 कोटी, भैरवनाथ (शिवशक्ती) 6.07 कोटी, क्युएनर्जी 0.43 कोटी, भीमाशंकर 0.10 कोटी अशी एकुण 90 कोटी रुपये एफआरपीची रक्कम थकीत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. एफआरपीची थकीत रक्कम न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाधयक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्क प्रमुख शहाजी सोमवंशी,  तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने,  अजय साळुंके, विजय सिरसट, गणेश कावरे,  सतीश डाके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.


 
Top