धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ धाराशिव उपकेंद्र येथील प्रो. डॉ. एम के पाटील हे लाभले होते तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे लाभले.

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ .बापूजी साळुंखे आणि सर डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम विज्ञान मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. अलका इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर डॉ.संदीप देशमुख यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

 प्रा. डॉ.एम. के. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान मंडळाच्या वतीने निबंध लेखन व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधीका पाटील आणि ज्योती कदम यांनी केले तर आभार डॉ. कुणाल वणंजे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी हिंदी विभागाचे प्रमुख प्रभारी प्राचार्य प्रा.श्रीराम नागरगोजे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. सावता फुलसागर व मोठ्या संख्येने गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top