नळदुर्ग (प्रतिनिधी)- राज्यात नविन 49 तालुके निर्मिती करण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू असुन निदान यावेळी तरी ऐतिहासिक नळदुर्ग शहराला राज्य सरकारने तालुक्याचा दर्जा द्यावे हीच नळदुर्ग शहर व परीसरातील 75 ते 80 हजार नागरीकांची अपेक्षा आहे.

नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले हे शहर जवळपास 60 ते 70 गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. निजाम राजवटीत नळदुर्ग हे सुभा होते त्यानंतर सुभा जावुन नळदुर्ग हे जिल्हा झाले त्यानंतर निजाम राजवटीतच नळदुर्ग शहराचा जिल्ह्याचा दर्जा जावुन नळदुर्ग हे तालुक्याचे ठिकाण झाले. मात्र आज नळदुर्ग शहर ना जिल्हा आहे ना तालुका आहे आज नळदुर्ग हे फक्त एक शहर म्हणुन राहीले आहे. वास्तविक पाहता आजपर्यंतचा इतिहास पाहता कुठल्याही गावची किंवा शहराची ही प्रगती झाल्याचे पहावयास मिळते. मात्र नळदुर्ग शहराच्या बाबतीत हे अपवाद आहे. कारण नळदुर्ग शहराची प्रगती नाही तर अधोगती झाली आहे. असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. राज्यसरकारने यापुर्वीच ऐतिहासिक नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा देऊन नळदुर्ग शहरावर झालेला अन्याय दुर करणे गरजेचे होते. मात्र शासन दरबारी नळदुर्ग शहरावर झालेला आजपर्यंत कुणी मांडला नसल्याने राज्यसरकारने आजतागायत नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा दिला नाही.

राज्यसरकारने नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा दिला तर निश्चितपणे नळदुर्ग तालुका हा संपुर्ण राज्यात एक आदर्श तालुका ठरू शकेल. त्याचबरोबर नळदुर्ग तालुका करणे हे सरकारलाही आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे. कारण नळदुर्ग शहरात शासकीय कार्यालय निर्माण करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहर दळणवळणाच्या दृष्टीनेही अतीशय सोईचे ठरणार आहे.त्याचबरोबर शहरात उद्योग धंद्यासाठी वीज आणि पाणीही मुबलक उपलब्ध आहे. नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर असल्याने येथुन राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाता येते.

नळदुर्ग शहर तालुक्यासाठी पुर्णपणे सक्षम असतांना आजपर्यंत नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा का मिळाला नाही याबाबत नळदुर्गकरांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. शासन दरबारी नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न रेंगाळत पडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नळदुर्ग शहराची राजकीय ताकद त्याठिकाणी कमी पडत आहे. कारण जिल्ह्याचे पहिले खासदार नळदुर्गचे सुपुत्र व्यंकटराव काका नळदुर्गकर हे होते. त्यावेळी जिल्ह्याचे राजकारण नळदुर्ग शहरांतुन चालत होते. जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ही नळदुर्ग शहरांतुन ठरत होती. मात्र आज हे सर्व इतिहासजमा झाले आहे.याला कारण नळदुर्ग शहरांतील जनताच कारणीभुत आहे.आज नळदुर्ग शहरांतील राजकीय मंडळींना दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वाईट सवय लागली आहे. जोपर्यंत हे बंद होणार नाही आणि नळदुर्गकरांचा स्वाभिमान जागृत होणार नाही तोपर्यंत कुणीच तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला कुणी गृहीतही धरणार नाही. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी पुन्हा एकदा नळदुर्गकरांना एकत्रित येऊन जनआंदोलन करावे लागणार आहे.

मात्र आज नळदुर्ग शहरातील कांहीजनांना एक सवय लागली आहे की, शहरातील मुख्य चावडी चौकात बसुन फक्त विकासाच्या किंवा तालुका निर्मितीच्या गप्पा मारण्याची. त्याचबरोबर चावडीत बसुन नेत्यांना अर्वाच्य भाषेत बोलायचे आणि समोर तो नेता आला की त्यांच्यासमोर शेपुट घालायचे या प्रकारामुळे खऱ्या अर्थाने नळदुर्ग शहराची अधोगती झाली आहे. ही सवय नळदुर्गकरांनी बंद करणे गरजेचे आहे. शहरात कुठल्याही पक्षाचा नेता आला तर त्या नेत्यांचे स्वागत करा मात्र पुर्णपणे त्या नेत्यांवर अवलंबुन राहु नये. शहराचा विकास किंवा शहरांतील विकासाची कामे ही शहरांतील पुढाऱ्यांनीच ठरवावे दुसऱ्यांचा यामध्ये हस्तक्षेप होऊ देऊ नये तरच शहराची आणि शहरांतील पुढाऱ्यांची किंमत राहते.

राज्य सरकार राज्यात नविन 49 तालुके निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे निदान यावेळी तरी ऐतिहासिक नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सरकारवर याबाबत दबाव आणण्यासाठी नळदुर्गकरांनी सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजुला ठेवुन सर्वांनी एकत्रीत येवुन जनआंदोलन करण्याची आज नितांत गरज आहे. कारण “आता नाही तर पुन्हा कधीच नाही“ ही परीस्थिती निर्माण झाली आहे.कारण आता एकदा तालुक्याची निर्मिती झाली तर पुढील अनेक वर्षे राज्यात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार नाही. त्यामुळे कांहीही करून यावेळी नळदुर्ग तालुका व्हावा यासाठी नळदुर्गकरांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न शासन दरबारी उपस्थित करावा यासाठी त्यांना नळदुर्ग तालुका निरीमितीच्या शिष्ठमंडळाने त्यांची भेट घेणे गरजेचे आहे.

आज नळदुर्ग तालुका नसल्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील गावच्या नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला नसल्याने आज पर्यंत शहर विकासापासुन कोसो दुर आहे. त्याचबरोबर शहरात रोजगाराची कुठलीच संधी उपलब्ध नसल्याने शहरात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. या सर्व समस्या दुर होण्यासाठी नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.


 
Top