धाराशिव (प्रतिनिधी)-दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी  साजरी  होणाऱ्या शिवजंयतीच्या अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी  या दृष्टिने पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली  दि. 16 फुब्रुवारी  रोजी  12.00 वा. सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय,  धाराशिव येथे शांतता समितीच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी  स्वप्नील राठोड, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. तसेच सदर बैठकीला  मध्यवर्ती  शिवजंयती  समितीचे, शिवराज्याभिषेक समितीचे व इतर मंडळाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध मंडळे शिवजंयती उत्सवाच्या निमीत्ताने विविध कार्यक्रमांचे, दुचाकी रॅलींचे तसेच मिरवणूकांचे आयोजन करत असतात. तरी  सार्वजनिक मंडळांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंदणी करुन रितसर परवानगी घ्यावी. तसेच मिरवणुकामध्ये कर्णकर्कश डि.जे. डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात येवू नये, दुचाकी रॅली दरम्यान वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेवून सर्व मंडळांनी व नागरिकांनी शांततेत शिवजंयती उत्सव पार पाडण्याचे  आवाहन  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपस्थितांस व जनतेस केले आहे.

बसस्थानक ते छत्रपती शिवाजी चौक अतिक्रमण हटविणार

शिवजयंतीनिमित्त बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचे हार, फुले दुकानासह इतरांनी केलेले अतिक्रमण हटविणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या मराठा आरक्षणावरून चालू असलेले आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचे त्यांना सांगितले आहे असे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराज चौक सोडणार नाही

शांतता समितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलन दोन स्थगित करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहराच्या आजूबाजूच्या 8 ते 10 गावच्या लोकांनी बैलगाड्यांसह चालू केलेले ठिय्या आंदोलन बंद करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे परत शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवजयंती निमित्त शहरात मोठ्या मिरवणुका, मोटार सायकल रॅली आदी दरवर्षी असतात. या जागेवरून आम्ही कुठेही हलणार नाही अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ठिय्या आंदोलन करणाऱ्या लोकांनी दिली. 
 
Top