धाराशिव (प्रतिनिधी)-येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात आले.

धाराशिव येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे यांच्या शुभ हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला  पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.मारुती लोंढे म्हणाले की, लहुजींचा सखोल इतिहास लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे योगदान मोलाचे आहे ते विसरता येणार नाही. ज्योतिबा फुले ,टिळक ,आगरकर यासारख्या महापुरुषांना तालमीमध्ये प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केले. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवीन युवकांची व आधुनिक इतिहासकारांची आहे. पीएच.डी सारख्या संशोधनात लहुजी वस्ताद साळवे यांचा विषय घेऊन त्यांच्यावर संशोधन करून त्यांचा महान इतिहास युवकांनी समाजापुढे आणावा असे आवाहन त्यांनी केले .या महान देशभक्ताला या क्षणी आम्ही वंदन करतो असेही ते म्हणाले . यावेळी डॉ. विकास भोवाळ, शहराध्यक्ष सुरज लोंढे, बी.आर.एस. चे निखील चांदणे,कुमार कांबळे सुभाष पाटोळे,सुनील साळुंखे, मानिक साठे व इतर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top