धाराशिव (प्रतिनिधी)-कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सिना नदीवर घाटणे येथे बांधलेल्या बॅरेजेसमधून उपसा सिंचन पध्दतीने कॅनालद्वारे 63 किलोमिटर अंतर पार करत तुळजापूर शहरातील रामदरा तलावासह इतर स्टोरेज टँकमध्ये हे पाणी जूनमध्ये येणार आहे. यासाठी भोयरे येथे पंप हाऊस बांधण्याचे काम चालू आहे. दरम्यान, या संदर्भातील 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

1999-2000 मध्ये तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पुराचे वाया जाणारे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे डॉ. पाटील यांचे पुत्र सध्या भाजपाचे आमदार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या योजनेचा पाठपुरावा करत आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी युती सरकारने वेळेवर पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला गती आली आहे. पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातील पुरामुळे आलेले पाणी समुद्राला जावून मिळते. ते पाणी मराठवाड्याला मिळण्यासाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. येत्या 10 दिवसात जागतिक बँकेची टीम या कामाच्या पाहणीसाठी येणार आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. 

वर्षभरात पावसाळ्यातील 75 दिवस सिना नदीवरील घाटणे बॅरेजेस मधून 2.24 टीएमसी पाणी रामदरा तलावाससह तर स्टोरेज टँकमध्ये लिफ्ट करण्यात येणार आहे. यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारा या तीन तालुक्यातील 10 हजार 862 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 


81 टक्के वीजबिल सरकार भरणार

तुळजापूर भागातील स्टोरेज टँककडे जाणारे हे पाणी कॅनॉल व बंद पाईपद्वारे जाणार आहे. घाटणे बँरेजेस्‌‍वर भोयरे पंप हाऊस व इतर जे विजेचे बील येणार आहे त्यापैकी 81 टक्के वीजबिल सरकार भरणार आहे. तर 19 टक्के वीजबिल शेतकरीवर्ग भरणार आहेत अशी माहिती धाराशिव पाटबंधारे मंडळचे अधीक्षक अभियंता बी. आर. शिंगाडे यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता अमोल नाईक, भाजपा जेष्ठ नेते ॲड. मिलिंद पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य उपस्थित होते. 



 
Top