कळंब (प्रतिनिधी)-  कळंब छत्रपती शिवाजी महाराज हे वारसा हक्काने बनलेले राजे नव्हते तर त्यांनी स्वतःची राज गादी तयार केली. इतिहासात अनेक राजे व मोठ्या सत्ता होऊन गेल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की त्यांचे नाव हजारो वर्ष कायम राहील. त्यांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या, त्यांचा सन्मान केला. प्रसंगी महिलावर अत्याचार करणाऱ्यानां  कठोर शिक्षा केल्या. आपला परका असा भेद केला नाही.  यामुळे शत्रू पक्षातील देखील राजा बद्दल विश्वास व आदर होता. सैन्य कमी जरी असले तरी स्वराज्य व छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण पणाला लावणाऱ्या मावळ्यामुळे शत्रूला पळती भुई थोडी झाली. राजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मरण समोर उभे असताना देखील त्याची परवा न करता त्यास सामोरे गेले अठरापगड जातीतील हे मावळे होते पन्हाळगड वेढ्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे  यांनी प्राणाची बाजी लावली असे विचार प्रसिद्ध युवा वक्ते अविनाश भारती यांनी शिव सेवा तालीम संघ शिवजयंती उत्सव समिती कळंब आयोजित व्याख्यानमालेतील ढाल तलवारी पलीकडील शिवराय या विषयावरील तिसरे पुष्प गुंफित असताना व्यक्त केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात आजची तरुण पिढी दिशाहीन होत असून, व्यसनाचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून आपल्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आई-वडिलांचा विसर पडत आहे असे सांगून शिवाजी महाराजांचे चरित्र वाचन करावे व त्याचे अनुकरण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या या प्रबोधनपर व्याख्यानात आजची तरुण पिढी सोशल मीडिया, मोटार गाडी, फॅशन यात अडकली असल्याचे विनोदी शैलीत मांडणी केली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व जिजाऊ वंदना कार्यक्रमाने झाली याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप पाटील, कांतीलाल बागरेचा,राजाभाऊ मुंडे, अड,दिलीपसिंह देशमुख, मुसादेक काझी, संजय मुंदडा, मुस्तान मिर्झा, शंकर वाघमारे, श्याम खबाले, नागनाथ घुले, शंकर करंजकर, भागवत चोंदे, किशोर वाघमारे यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी व्याख्याते अविनाश भारती यांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम यांनी व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार समिती सदस्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट, रमेश शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम, अतुल कवडे, सुरेश शिंदे, प्रताप शिंदे, गणेश भवर, नामदेव पौळ, गोविंद चौधरी, राजाभाऊ गरड, दादा खंडागळे, विशाल वाघमारे यांनी स्वागत व परिश्रम घेतले.


 
Top