धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, भूम, परंडा या सर्व तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान, काही किरकोळ घटना वगळता बंद शांतते पार पडला. धाराशिव शहरात सर्व बाजारपेठ्या बंद होत्या. शहरातून युवकांनी रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही युवकांनी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर थांबून सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे वृत्त वाहिन्यावरून समजल्यानंतर तुळजापूर- परतूर या बसवर आयुर्वेक कॉलेज समोर दगडफेक करण्यात आली. तर कळंब येथे संतप्त युवकांनी मांजरा पुलावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. भूम येथे गालाई चौकात सरकार का प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधातही घोषणा बाजी करण्यात आली. तुळजापूरमध्ये ही भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून दुपार पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर एक रॅली काढून राजेशहाजी महाद्वारासमोर सरकारला सदबुध्दी द्या व जरांगे पाटील यांना प्रकृती स्वाथ्य लाभू द्या यासाठी महाआरती करण्यात आली. गेल्या तीन दिवसापासून तीन युवक तुळजापूर मध्ये जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषणास बसले आहेत. त्या तीन युवकांच्या समर्थनार्थ तुळजापूर शहरातून रॅलीकाढून महिलांनी लाक्षणिक उपोषण केले. धाराशिव शहरातही गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण कर्त्यांना अनेकांनी भेटी देवून पाठिंबा दिला. 

बंदच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


 
Top