तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष शिबिर 2025-26 चा समारोप कार्यक्रम मसला (खु.) ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे बोलत असताना त्यांनी प्रतिपादन केले राष्ट्रीय सेवा योजना शिबीर शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले , संत गाडगे बाबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला. स्वागत समारंभात स्वयंसेवकांनी पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या समारोप समारंभासाठी प्रमुख उपस्थितीत श्री रामेश्वर वेत (सरपंच), श्रीराम खराडे (उपसरपंच), श्री धनंजय लोढे, तसेच प्राचार्य डॉ. जीवन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी भूषविले. यावेळी शिबिर अहवाल वाचन सारंग सुशांत आपुणे (बी.ए. तृतीय वर्ष) या स्वयंसेवकाने केले. शिबिराच्या कालावधीत ग्रामस्वच्छता, जनजागृती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक उपक्रम, तसेच श्रमसंस्कार उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याची माहिती अहवालात नमूद करण्यात आली.
धनंजय लोंढे यांनी मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वयंशिस्त व राष्ट्रसेवेची भावना निर्माण करणारी चळवळ असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत समाजासाठी जबाबदार नागरिक घडविण्यात एनएसएसचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या समारोप कार्यक्रमामुळे शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गोकुळ बाविस्कर, प्रा .स्वाती बैलवाड,डॉ.नेताजी काळे, प्रा . बालाजी कऱ्हाडे, प्रा.सुदर्शन गुरव ,प्रा बाळासाहेब राऊत , प्रा.शिवकन्या निपाणीकर प्रा. क्रांती कदम प्रा. सतीश वागतकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राणुबाई कोरे तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक गौरव डोलारे यांनी केले.
