कळंब (प्रतिनिधी)- ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार, सगेसोयऱ्यांच्या संदर्भात अधिक स्पष्टता कधी आणणार? सरकारवर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार (दि.10) पासून आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. आरक्षण हे मराठा समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मराठ्यांशी दगाफटका करू नका,तत्काळ आरक्षण संदर्भातील कारवाही करावी यासह अन्य मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.उपोषणाला पाठिंबा म्हणून कळंब तालुका सोमवार (दि.12) कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

शहरातील बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आली असून, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर देखील या बंदचा परिणाम झाला आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पाळण्यात आला आहे. कळंब तालुक्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पाळण्यात आला असून, रविवारी याबद्दलची माहिती देण्यात आली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


 
Top