धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होण्याकरिता जिल्हा परिषद शाळा स्थलांतरित करावी व त्याच्या उभारणीकरिता निधी द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन केली आहे. 2015 पासुनचे संदर्भ या पत्राद्वारे सरकारला दिले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळा (ता. धाराशिव) येथे 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. त्याकरिता त्यांनी  कसबे तडवळा येथे मुक्काम केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती वर्षे (दिनांक-14 एप्रिल 2015 ते दिनांक- 14 एप्रिल 2016 हे समता व सामाजिक न्याय वर्षे म्हणुन साजरे केले. त्यानुसार राज्यातील एकुण 28 ऐतिहासिक व सांस्कृतीक स्थळे/ ठिकाणे निवड केली होती. त्यामध्ये कसबे तडवळे धाराशिव येथील सार्वजनिक वाचनालय, क्रांतीस्तंभ व इतर कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.या प्रकल्पासाठी आयुक्तालयाकडुन निधी वितरण करण्यात आला आहे. कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय व क्रांतीस्तंभ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या जागेवर बांधण्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने स्मारकाचे काम रखडलेले आहे. 12 ऑक्टबर2022 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तथा जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी, गावकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत मौजे कसबे तडवळे येथे बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्य ठिकाणी बांधुन दिल्याशिवाय स्मारकाचे काम होणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी कळविलेआहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील गट नंबर 229 मधील सहा हजार चौ.मी. जागेवर बांधण्यासाठी दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक व आराखडे सादर केले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती, धाराशिव च्या कार्यकारी मंडळाने 25 जुलै 2019 रोजी ठराव केला. ही जागा शासकीय जमीन धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीस भुसंपादनाच्या नुकसान भरपाईसह मावेजा घेऊन पणन संचालक यांच्या पुर्वपरवानगीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.या जागेचे मुल्यांकन उप विभागीय अधिकारी, धाराशिव यांनी थेट वाटाघाटीने/थेट खरेदी भुसंपादन करण्याच्या नियमानुसार एक कोटी  97 लाख रुपये मोबदला निश्चित केला. सामाजिक न्याय विभागाकडुन उपलब्ध होण्याच्या अधिन राहुन जागेचे आगाऊ ताबा देण्यासाठी प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती धाराशिव यांना आदेश देणेबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी संचालक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पुणे यांना कळविले आहे. याबाबत सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव यांना आदेशित करुन शाळेची इमारत बांधकामा साठी 12 कोटी 83 लाख रुपये इतकी रक्कम वितरीत करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सचिवांकडे केली आहे.


 
Top