धाराशिव (प्रतिनिधी)- सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धाराशिव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने  श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन धाराशिव येथे 18,19 व 20 फेब्रुवारी 2024 रोजी श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल,धाराशिव येथे सायंकाळी  6.30 ते 9.30 वाजता दरम्यान सादर करण्यात आले.

शिवराज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य बघण्याचा योग समस्त धाराशिवकरांना शिवगर्जना महानाट्याच्या माध्यमातून याची देही याची डोळा आला.महानाट्यातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण, उत्तम वेशभूषा,सुसंगत प्रकाश योजना व सजावट तसेच उपस्थित रसिकांकडून महानाट्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने क्रीडा संकुलाचे वातावरण शिवमय झाले होते.

शिवगर्जना या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विनायक चौगुले या कलाकाराने अतिशय उत्तमपणे साकारली. मा जिजाऊंची भूमिका दिपाली हांडे, बालशिवाजीच्या भूमिकेत सुरज कोळी,शहाजी राजांच्या भूमिकेत सुहास चौगुले तर अफजल खानाची भूमिका शकील पटेल यांनी अतिशय सुरेख साकारली आहे. 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते शिवगर्जना या महानाट्याचे उद्घाटन श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, तहसीलदार प्रवीण पांडे,श्री.काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,साहित्यिक युवराज नळे,शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव व निर्मात्या रेणू यादव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

19 फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, साहित्यिक युवराज नळे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,साहित्यिक युवराज नळे, शिवगर्जना या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव,निर्मात्या रेणू यादव आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 20 फेब्रुवारी रोजी महसूल उपजिल्हाधिकारी संतोष भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,जिल्हा ग्राहक मंचचे श्री.सस्ते,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,साहित्यिक युवराज नळे,शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव,निर्मात्या रेणू यादव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मागील तीन दिवसांत समस्त धाराशिवकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास अनुभवला.प्रचंड प्रतिसादात या महानाट्याचा 20 फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात आला.


 
Top