धाराशिव (प्रतिनिधी)-शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हा वार्षिक कार्य योजनेअंतर्गत अनावश्यक खर्च टाळावा. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद धाराशिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्हा वार्षिक कार्य योजनेअंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिकसाठी 15 ते 20 कोटी रुपये सर्वसाधारण शीर्षक खाली व नाविन्यपूर्ण योजनेखाली खर्च होणार असल्याचे व त्यास आपणास द्वारे मंजुरी देण्यात येणार असल्याचे समजले याद्वारे जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी गरज नसलेले साहित्य खरेदी करणार असल्याचे समजते. प्राथमिक शाळांमधून या योजनेअंतर्गत जे साहित्य पुरविणार आहेत ते साहित्य आय.आय.टी, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालय अशांसारख्या शैक्षणिक संस्थांना आवश्यक असते असे साहित्य प्राथमिक शाळांमध्ये देणे ही बाब जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्यासारखे आहे. रोबोटिक लॅब, वर्चुअल रियालिटी क्लासरूम, विज्ञान शाळा या साऱ्या बाबी कितपत मराठी प्राथमिक शाळांसाठी उपयोगी ठरतील याचा आपण विचार करावा. सदरील साहित्य हे खाजगी कंपन्यांमार्फत त्यांच्या सी.एस.आर फंडातून देण्यास भाग पाडल्यास हे योग्य राहील.

वास्तविक पाहता जिल्हा परिषदांच्या शाळांमधून लाईट बिल न भरल्यामुळे कित्येक शाळांचा विद्युत पुरवठा बंद आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सुमारे 1.5 कोटी बिल थकबाकीत आहेत, त्यामुळे शाळेत लाईट उपलब्ध नाही. शाळेतील लाईट वरील सर्व साधने विनावापर पडून आहेत ही अतिशय महत्त्वाची बाब आपण विचारात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेकडून याची माहिती आपण स्वतः घ्यावी. शाळांना सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन पट्ट्या नाहीत. विद्यार्थी पावसाळ्यात व हिवाळ्यात फरशीवर बसतात. त्या चिमुकल्या जीवांना थंडी लागत नसेल काय हा प्रश्न आपणाला किंवा भेडसावणार.सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच व आसन पट्ट्या दिल्या तर ते चांगले ठरेल. तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्याचे साहित्य जसे की फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट साहित्य, रगोर आदी साहित्य दिले तर विद्यार्थ्यांना आनंद मिळेल व शिक्षण व शाळेची गोडी लागेल.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये विज्ञान, मराठी, इतिहास या विषयाला अनुषंगून प्रत्यक्ष पुस्तके पुरवठा करणे गरजेचे आहे. ही पुस्तके विद्यार्थी व शिक्षक यांना वाचनाला पूरक ठरतील व मुलांनाही वाचनाची गोडी लागेल. शाळेतील ग्रंथालय समृद्ध होईल त्यामुळे बालसाहित्य, मनोरंजक गोष्टी, संस्कार करणारे पुस्तके पुरविण्याचा आपण विचार करावा. शाळेमध्ये स्वच्छतागृहाची सुविधा केली तर तसेच पिण्याचे पाण्याची कायम सुविधा केली तर ते अतिशय योग्य ठरेल. इयत्ता पाचवी ते दहावी वर्गात विज्ञानाच्या पुस्तकातील प्रयोगासाठी आवश्यक साहित्य दिले तर ते फायद्याचे ठरेल. कृपया आपण प्रत्यक्ष शाळेला जे आवश्यक आहे असे साहित्य, सुविधा यांची मागणी शाळेकडून घेतली तर ते उपयोगी ठरेल व जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होणार नाही. आपण  सक्षम अधिकारी म्हणून या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे या निवेदनात म्हटले आहे.


 
Top