उमरगा (प्रतिनिधी)-विद्यार्थी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र आजच्या शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्राथमिक स्तरावर क्रीडा शिक्षकाची नेमणूक केली जात नाही ही चिंतेची बाब आहे. मात्र आजच्या शिक्षकांनीच स्वतः पुढाकार घेऊन खेळाविषयीचे ज्ञान सखोल माहिती करून घ्यावी व आपल्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान देऊन राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवावीत असे प्रतिपादन सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव वडणे यांनी केले.

शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी श्री राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिनाथ दंडगे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक डॉ. चंद्रकांत महाजन, राजा देशती, प्रवीण अंदुरकर, संजय धोंडदेव, मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, मुख्याध्यापिका सविता लोहार आदी सह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष मल्लिनाथ दांडगे म्हणाले की, शरीर बलवान व बळकट असेल तरच आजची तरुणाई सशक्त बनणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या वयापासूनच व्यायामाची सवय लावून शरीर व मन बलवान करावे. कार्यक्रमात 26 जानेवारी निमित्त विविध क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले होते. त्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना तसेच विविध परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते बक्षीस व व मेडल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता लोहार तर सूत्रसंचालन अनुराधा तुळजापुरे यांनी तर आभार समीर देशपांडे यांनी मानले.


 
Top