धाराशिव (प्रतिनिधी)- कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो . या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळ ,आम्ही सिद्ध लेखिका आणि सुशीला देवी साळुंखे अध्यापक महाविद्यालय या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने विशाखा साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न झाले .

अक्षरवेल महिला मंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून घेत असलेल्या विशाखा साहित्य संमेलनाचे हे सलग पाचवे वर्ष .या पाचव्या वर्षीही या विशाखा साहित्य संमेलनात गझल मुशायरा , कवी संमेल , कथाकथन अशा विविध सत्रांनी संमेलनामध्ये रंगत भरली. या संमेलनासाठी जिल्हाभरातूनच नाही जिल्ह्याच्या बाहेरूनही महिला प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यिक डॉ. नभा काकडे पुण्याहून प्रा.माया मुळे  ,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ कमलताई नलावडे ,अक्षरवेलच्या अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख , अक्षरवेल संस्थापक अध्यक्ष डॉ.रेखा ढगे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ.प्रकाश कांबळे ,गझलकारा स्नेहलता झरकर , अक्षरवेल च्या सचिव अपर्णा चौधरी आणि कविता पुदाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रमुख वक्त्या डॉ. नभा काकडे म्हणाल्या  की,स्त्री मुळातच सक्षम आहे. पण तिला सक्षमपणाची जाणीव करून देण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. याच व्यासपीठावरून प्रश्न मांडले पाहिजेत .प्रश्न उपस्थित जर करता आले नाही तर आपली प्रगती खुंटते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने सजग होऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. वेद बुकापासून फेसबुक पर्यंतचा स्त्रीचा प्रवास खडतर आहे .तिला नेहमीच ही भावना असते की माझ्यामुळे या घरातल अडत. या विचाराने ती स्वतःचा विकास खुंटवते. पण तिने स्वतःला प्रगल्भ केले पाहिजे.

अक्षरवेल साहित्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुलभाताई देशमुख यावेळी बोलताना म्हणाल्या की अक्षरवेल च्या माध्यमातून महिला लिहित्या झाल्या असून , त्यांनी आपली पुस्तके प्रकाशित केली आहेत.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या साहित्यिक मैत्रिणी आज धाराशीवच नाव मोठं करत आहेत .आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे .त्यांनी गेल्या वर्षभरात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा उल्लेख करून या सर्वजणींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

विशाखा संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रकाश कांबळे यांनी हे संमेलन अतिशय सुंदर झाले असून आपण यापुढेही सर्वतोपरी या संमेलनासाठी महाविद्यालयाच्या वतीने मदत करू, अशी ग्वाही दिली.

पुण्याहून आलेल्या प्रा. माया मुळे यांनी स्त्रीचा प्रवास किती खडतर आहे. पण त्या मधूनही ती किती सक्षमपणे घडू शकते हे अनेक उदाहरणातून जेव्हा सांगितले तेव्हा सभागृह अश्रू मध्ये चिंब चिंब भिजून गेले.

अध्यक्षीय समारोप करताना कमलताई नलावडे म्हणाल्या की महिलांनी घडलेल्या विविध प्रसंगाचे सूक्ष्मपणे अवलोकन करून त्यावर लिहित झालं पाहिजे. प्रश्न मांडले पाहिजेत. समाजामध्ये साहित्यिकाची भूमिका महत्त्वाची असून आपण अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि अक्षरवेलच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या विशाखा साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. रेखाताई ढगे आणि स्नेहलता झरकर यांनी केले. याच संमेलनात डॉ. रेखा ढगे यांचा सहभाग असलेल्या व महाराष्ट्रातील लेखिकांनी लिहिलेल्या “अक्षरा “ या प्रातिनिधीक कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनाच्या सुरुवातीला स्वागत गीत मोक्षा करवर आणि ज्योती मगर यांनी म्हटले. तर गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत उपस्थित सर्वांनीच म्हटले. यावेळी झालेल्या गझल, कथाकथन आणि कवी संमेलन या सत्राचे अध्यक्षपद अनुक्रमे प्रा.विद्या देशमुख , प्रा.सुनिता गुंजाळ ,डॉ.अस्मिता बुरगुटे यांनी भूषविले ,तर विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ.सोनाली दीक्षित  ,स्वप्नाली अत्रे ,जयश्री फुटाणे, मीना महामुनी ,शिवनंदा माळी ,ज्योती कावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडीसाठी  येथील मुक्तांगण शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यांनी सुंदर मराठी गीतावर नृत्य केले .याबद्दल या शाळेच्या शिक्षिका ,आहेर आणि जोशी  यांचाही यावेळी सत्कार करून चिमुकल्यांना बक्षीस देण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ यांनी केली तर आभार सचिव अपर्णा चौधरी यांनी मानले.


 
Top