धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर धाराशिवमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट व भाजपामध्ये शीत युध्द सुरू झाले आहे. या शीत युध्दासाठी दोन्ही पक्ष आपले कट्टर कार्यकर्ते उभा करत आहेत. निमित्त मात्र केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमाचे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मतभेद तीव्र स्वरूपात समोर येत आहेत. भाजपाचे कार्यकारी सदस्य नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेवून ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार व आमदारांवर विविध आरोप केले होते.
त्याला प्रतिउत्तर म्हणून खासदार ओमराजे यांचे समर्थक शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेवून गेल्या 40 वर्षात सुतगिरणी, मोपेड, कुक्कुटपालन, मेडिकल कॉलेज सुरू करून अनेकांना रोजगार दिला आहे. हायवे लगत सर्व्हीस रोड होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत होतो. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटून कामे मंजूर करून घेतले आणि त्याचे श्रेय मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील बॅनरबाजी करून घेत आहेत. पालकमंत्र्यांनी सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतमध्ये राणा पाटील यांच्या श्रेयवादाची पोलखोल केली आहे. आमच्यावर टक्केवारीचा आरोप केला जातो. परंतु टक्केवारी कोण घेतो यांची व्हिडीओ क्लीप असल्याचा गौप्य स्फोट सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत केला.
सोमाणी यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी पत्रक काढून सोमाणी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. गोरगरिबांच्या हक्काचा रेशनचा गहू व तांदूळ चोरीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत ते तालुकाप्रमुख कसे काय आहेत?याबाबत आमदार, खासदारांनी उत्तर द्यावे. अशा लोकांना राणा पाटील यांच्यावर बोलण्यांचा अधिकार आहे का? असा प्रश्नही इंगळे यांनी उपस्थित केला. टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे. कोणाकडून किती वसूल केले यांची पुराव्यानिशी माहिती लवकरच जनतेसमोर आणली जाईल असा इशारा इंगळे यांनी दिला आहे.