धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिवकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिजाऊ चौक ते बोरफळ रस्ता सुधारणेचा रुपये 570 कोटींचा प्रस्ताव हायब्रिड ॲन्यूटी अंतर्गत सादर करण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या रस्त्याच्या सुधारणेने या भागातील दळणवळण सुविधेला मोठी बळकटी मिळणार आहे. 

या रस्त्याच्या सुधारणेमध्ये जिजाऊ चौक ते सांजा चौक या शहरांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण व नाली प्रस्तावित असून मार्गावरील गावांतर्गत लांबीत सिमेंट रस्ता करण्यात येणार आहे. एकूण 47.55 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून रस्त्याची रूंदी 10 मीटर ठेवण्यात आली आहे. यासाठी रुपये 570 कोटी खर्च अपेक्षित आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने बार्शी ते कौडगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. कौडगाव ते जिजाऊ चौक मंजूर रस्त्यासाठी कंत्राटदारला नियुक्ती आदेश देण्यात आला असून या कामास सुरुवात होत आहे. त्यामुळे लवकरच बार्शी ते बोरफळ अशी कनेक्टिव्हिटी मिळणार असून धाराशिवकरांसह औसा व निलंगा भागातील प्रवाशांची यामुळे मोठी सोय होणार आहे. 

पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे वेगाने काम करत असून जिल्ह्यात महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. दळणवळण सुविधांच्या बळकटीकरणाने जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


 
Top