धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) शिक्षण विभाग, जि. प. धाराशिव यांना निवेदन देऊन खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक व अतिरिक्त शिक्षकांना रूजू न करणाऱ्या शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे वेतन नियमित करावे. तर ज्या मुख्याध्यापक, संस्थाचालकांनी अतिरिक्त शिक्षकांना शाळेत रूजू करून घेतले नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच अतिरिक्त शिक्षक व समायोजन न करणाऱ्या शाळेतील शिक्षकांचे गृह, सोसायटी, कार व इतर कर्जाचे हप्ते दरमहा असतात व ते नियमित परतफेड नाही झाली तर त्यांचे आर्थिक नुकसान होते. याला जबाबदार कोण?खरे तर सदर शिक्षक कर्मचारी यांचे अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेणे वा न रूजू करणे याच्याशी काडीचाही संबंध येत नाही तरी देखील त्यांचे वेतन थांबवले जात आहे. तरी सदरील बाधित शिक्षकांचे वेतन नियमित करून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा नसता बाधित शिक्षक व मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव हे मा. शिक्षणाधिकारी (माध्य.)यांच्या कार्यालयासमोर या न्याय मागण्यासाठी तीव्र आंदोलन करतील असा इशारा जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव यांनी दिला आहे. निवेदनावर डी.के.भोसले, रमण जाधव, सी. एन .माळी, एस.के.दराडे, डी.व्ही.कांबळे, ए.सी. बोंदर, व्ही.एस.पाटील , एस.एस. बळवंतराव या मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिका-यांच्या सह्या आहेत.