धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मागील आठ वर्षांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांच्या गंजलेल्या सळ्याचे (स्ट्रक्चरल ऑडिट) प्रशासकीय तपासणी करून परवानगी नंतरच काम सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बुधवारी (दि.10) जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 चे काम मागील आठ वर्षांपासून संथ व निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. महामार्गाच्या उड्डाण पुलांची कामे मागील अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहेत. पुढील कामासाठी सोडण्यात आलेल्या सळ्या अनेक वर्षांपासून उघड्या असल्याने वातावरणाच्या परिणामामुळे गंजून कुजलेल्या आहेत. यावरच पुढील काम केल्यास भविष्यात मोठा धोका होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित कंत्राटदार व महामार्ग प्राधिकरण असे निकृष्ट काम रेटून पूर्ण करण्याचा घाट घालत आहे. 

सदरील उमरगा, लोहारा, तुळजापूर व जिल्ह्यातील अर्धवट स्थितीतील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सर्व उड्डाण पुलांच्या कामांचे (स्ट्रक्चरल ऑडिट) त्रयस्थ संस्था व प्रशासनाकडून केल्यानंतर व अधिकृत परवानगी घेऊनच करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीच्या धोक्यास व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ही जीवघेणी कामे थांबली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन फंड, तालुका उपाध्यक्ष विराट पाटील आदी उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तात्काळ नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना याबाबत सूचना दिल्या.


 
Top