धाराशिव (प्रतिनिधी)-लेडीज क्लब धाराशिवने सलग 6 दिवस (दि. 5 जाने ते 10 जाने) आयोजित केलेल्या हिरकणी महोत्सवाला धाराशिवकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 161 विविध स्टॉलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या महोत्सवाला धाराशिवकर भरभरून प्रतिसाद देत असल्यामुळे या स्टॉल धारकामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.

दररोज सायंकाळी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रमांनाही भर भरून प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पाचव्या दिवशीचे आकर्षण म्हणजे सादर झालेला गीत रामायण नृत्याविष्कार हा कार्यक्रम.

संपूर्ण देश आयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणाचे आतुरतेने वाट पहात असण्याच्या पार्श्वभूमीवर लेडीज क्लब धाराशिवने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षक रसिकांनी अलोट गर्दी केली होती. सर्वप्रथम लेडीज क्लबच्या अध्यक्षा मा.सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते आई तुळजाभवानी ची आरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण लेडीज क्लब दिव्यांची आरास अन फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे नेते आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि सलग सहा दिवस लेडीस क्लब ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंहजी पाटील यांनी प्रोत्साहन देऊन महत्त्वाची भुमिका बजावल्याबद्दल त्यांचा लेडीज क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ग.दि.माडगूळकर यांच्या सुमधुर गीतावर गीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातील सादर केलेल्या गीतरामायण नृत्याविष्काराने संपूर्ण धाराशिवकरांची मने जिंकून घेतली. रामायणातील एक एक भावस्पर्शी प्रसंग सर्व रसिक तन्मयतेने पाहत होते. एक आजरामर कलाकृती लेडीज क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला. या नृत्याविष्कारात प्रमुख भूमिका सादर करणारे कलाकार आणि गीतरामायनाच्या दिग्दर्शक सोनिया परचुरे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व महिलांनाही प्रभू श्रीरामचंद्रांची मुर्ती आणि आई तुळजाभवानी मातेची विविध रुपे असलेले दिनदर्शीका भेट म्हणून देण्यात आली. यावेळी बोलताना लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, लेडीज क्लब आयोजीत हिरकणी महोत्सवच्या माध्यमातून अनेकींना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या उद्योगामध्ये प्रगती करावी, त्यांचे यश पाहून आपल्याला नक्कीच आनंद होईल.


 
Top