धाराशिव (प्रतिनिधी)-धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथील तेरणा कॉलेज समोरील छत्रपती शाहू महाराज चौकात भीषण अपघात झाला आहे. याच महामार्गावर कळंब तालुक्यातील धाराशिव साखर कारखान्याच्या परिसरात वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. दोन मालवाहू ट्रकचा एकमेकांवर समोरून आदळल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये एका ट्रकचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवच्या एमआयडीच्या पुलावरून सोलापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता. या पुलावरून डीमार्टकडे जाणारा रस्ता तीव्र उताराचा असल्यामुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक भरधाव वेगात उिव्हायडरच्या पलीकडे जावून विरूध्द बाजुने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर आदळला. अपघातावेळी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील भाग तुटून पडले. अपघात घडताच जवळच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये एका चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली. अपघात झाल्यावर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 


सर्व्हीस रोड बेपत्ता

धाराशिव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या महामार्गालगत सर्व्हीस रोड असणे आवश्यक होते. या हायवे लगत डीमार्ट, पोदार इंटरनॅशनल स्कूल व नवीन वसाहत असल्यामुळे सर्व्हीस रोडची आवश्यकता आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी सर्व्हीस रोड करण्यात आले नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात अनेकदा झाले. नागरिकांनी त्यानंतर रस्तारोको केला. परंतु हा हायवे तयार केलेल्या कंपनीने आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. 


 
Top