धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर - धाराशिव रेल्वेच्या मार्गाच्या संपादित जमिनीच्या मावेजाबाबत धादांत खोटी माहिती विरोधी पक्षाचे नेते पसरवित आहेत. अशा अर्धवटरावांच्या टिकेला आपण महत्व देत नाही, असा टोला भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला. ठाकरे शिवसेनेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांचे नाव न घेता त्यांनी ही टिका केली.
आ. पाटील शनिवारी प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाठक आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, की सोलापूर - धाराशिव रेल्वेच्या मार्गाच्या संपादित जमिनीच्या मावेजाबाबत धादांत खोटी माहिती विरोधी पक्षाचे नेते पसरवित आहेत. जमिनीची आधारभूत किंमत ठरविणे आवश्यक आहे. त्याच मुद्यावर सर्व शेतकऱ्यांना संघटित करुन न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. काहीही करुन रेल्वेमार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. लवकरच न्यायालयात हे प्रकरण दाखल केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये.
दरम्यान, रेल्वेमार्गातील भूसंपादत मावेजाबाबत आ. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवल्याची टिका खा. ओमराजेंनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आ. पाटील म्हणाले, की अर्धवटराव चुकीची टिका करीत आहेत. त्यांना कोणत्याची बाबीची माहिती नसते. केवळ चमकोगिरी करणे त्यांना जमते. एकही धड काम करता आलेले नाही. त्यांचे कामही अर्धवट असते. त्यामुळे अशा टिकेला महत्व देण्याचे कारण नाही. विजयी झाल्याबरोबर लोकसभेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव करणारे हे नेते आता कुवत नसतानाही पंतप्रधानांवर टिका करीत आहेत. अशा लोकांना महत्व देण्याचे कारण नाही.
महायुतीच्या नेत्यांवर टिका करुन पुन्हा त्यातील काहींना फोन करुन सांगायचे की विरोधात असल्यामुळे आम्हाला बोलावे लागते. मनाला लावून घेऊ नका, हे उद्योग कोण करते आम्हालाही चांगले माहिती आहे. आमचा लोकसभेचा उमेदवार प्रबळ असल्याचे माहिती झाल्यानेच समोरुन पातळी सोडून टिका होत आहे, असा वार आ. पाटील यांनी केला.