उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित यावरच अवलंबून असते. सध्या सोयाबीनचे भाव 4 हजार 500 रुपये प्रति क्वंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामूळे या दरात उत्पादन खर्च देखील भागत नसल्याने दरातील घसरण शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीची ठरत आहे. तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही घटली आहे.

तालुक्यात गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून खरीप हंगामातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यंदा पूर्ण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने व ऐन पीक तयार होण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम झाला. एकरी उत्पादन दोन ते तीन क्विंटलने कमी झाले आहे. सोयाबीन काढणी, पेरणी ते मळणी पर्यंतचा उत्पादन खर्च व सध्या मिळत असलेला दर पाहता उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. येत्या काळात निवडणुका होणार असल्याने खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत, या शक्यतेने सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला काही काळ 5 हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला दर पुन्हा 4 हजार ते 4 हजार 500 असा राहिला. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर काही दिवस सोयाबीन दरात तेजी येऊन दर 5 हजार ते 5 हजार 300 रुपये झाला. ही तेजी कायम राहून दर 6 हजार 500 रुपयांपर्यंत जाण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री थांबवली. बऱ्याच शेतकऱ्यांकडे गत हंगामातील सोयाबीन शिल्लक आहे. तथापि, मोठया प्रमाणात बाजारातील तेलाच्या दरात घसरण झाली व त्याचाच परिणाम म्हणून खाद्यतेला साठीचा कच्चामाल असलेल्या सोयाबीनच्या दरात घसरण होऊन दर पुन्हा खाली आले. त्यामुळे अजून किती काळ सोयाबीन घरी ठेवायचे व सोयाबीन विक्रीचे येणाऱ्या पैशांच्या आधारावर रब्बी हंगामासाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे सरकारने सोयाबीनची दरवाढ करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव 4 हजार 550 रुपये आहे. सोयाबीन निघाले होते, तेव्हा पाच हजारांचे भाव होते. आता सोयाबीन सुकलेले असून सुद्धा 4 हजार 500 रूपये भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. भाव वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते, पण सोयाबीनचे भाव वाढण्या ऐवजी कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. (मकरंद कुलकर्णी, शेतकरी, मुळज).

सोयाबीन दरात वाढ होईल या अपेक्षेने गेल्या वर्षी साठा केला होता. मात्र दर वाढले नाहीत. यावर्षी अत्यल्प पाऊस झाला तर ऐन पीक तयार होण्याच्या काळात पावसाने दडी मारल्यान उत्पादनावर परिणाम झाला. सध्याच्या बाजारात मिळणारा दर आणि  खर्चाचा हिशोब केला तर कुठेच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे शेतकर्याना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.( हरी माडजे, शेतकरी, त्रिकोळी).

* उमरगा कृ.उ.बा.स. मधील सोयाबीनचे दर *

दिनांक          कमाल           किमान          आवक

06 जाने.       4620             4600       16.50क्विं

08 जाने.       4625             4600       23.00क्विं

09 जाने.       4601             4590       34.50क्विं

10 जाने.       4625             4680       18.50क्विं

13 जाने.       4650             4600       27.00क्विं

16 जाने.       4631             4631       02.00क्विं

17 जाने.       4600             4560       51.00 क्विं 
Top