धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील ढोकी येथे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून 30 खाटाचे ग्रामीण रूग्णालय उभारणीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पळसप ता.जि. धाराशिव याठिकाणी स्थलांतरित करण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते तथा धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ-पाटील यांनी ना. तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ढोकी येथे आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. या केंद्रातंर्गत उपकेंद्र तडवळा, खामगाव, खेड, किणी, गोवर्धनवाडी, रूई या उपकेंद्राचा समावेश आहे. तर आरोग्य केंद्रांतर्गत 24 गावांचा समावेश आहे. यातंर्गत आरोग्य सेवा पुरविली जात आहे. विशेष म्हणजे ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे लातूर-बार्शी या राज्य महामार्गालगत असून अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या जखमींसह रूग्णांची संख्याही अधिक आहे. याठिकाणी ग्रामीण रूग्णालय उभाण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेवून ना. सावंत यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. परिपूर्ण प्रस्ताव आल्यानंतर ना. सावंत यांनी तातडीने ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून याठिकाणी ग्रामीण रूग्णालय उभारणीस मंजुरी दिली. आता याठिकाणी ग्रामीण रूग्णालय उभारले जाणार असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र धाराशिव तालक्यातील पळसप येथे स्थलांरित करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते तथा धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ-पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ना. सावंत हे प्रजासत्ताकदिनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर हे निवेदन सादर करण्यात आले. पळसपला आरोग्य केंद्र झाल्यास पळसपसह भिकार सारोळा, मोहतरवाडी, भुकनवाडी, कोळेकरवाडी, घोगरेवाडी व पानवाडी या गावांना आरोग्यसेवा मिळणार आहे. यावेळी शिवसेना नेते तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ऑम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, भूम पंसचे माजी उपसभापती बालाजी गुंजाळ, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष समाधान सातव आदींची उपस्थिती होती.


 
Top