धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत 2 हजार रूपयांची लाच घेताना 2 पोलिस शिपाई व एका खासगी व्यक्तीस अटक केली आहे. कारवाई न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली. वाशी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई तानाजी त्रिंबक तांबे, रणजित अनिल कासारे व खासगी व्यक्ती पवन राजेंद्र हिंगमिरे अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचेविरूध्द वाशी पोलिस ठाणे येथे अदखपात्र गुन्हा आहे. त्यामध्ये यातील आरोपी यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरूध्द 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर किरकोळ कारवाई करण्यासाठी मी बीट अंमलदार यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देवून त्रास देवू नको असे सांगण्यासाठी लाच मागणी केली. सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, पोलिस स्टेशन वाशी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलिस उप अधीक्षक यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलिस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांचा समावेश होता. 


 
Top