धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा विभाग, कृषि विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री.तुळजाभवानी कृषि महोत्सव 2024 चे 18 ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालय मैदान, धाराशिव येथे आयोजन करण्यात आले आहे. कृषि महोत्सवाचे उद्घाटन डॉ.तानाजीवराव सावंत,मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धाराशिव यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे पद्मश्री. राहीबाई सोमा पोपीरे (बिजमाता) ह्या राहणार आहेत.या कृषि महोत्सवाला जिल्हयातील शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

कृषि महोत्सवामध्ये एकूण 200 दालन असून त्यापैकी 100 दालने शासकीय योजना प्रकल्पासाठी असून उर्वरित खाजगी संस्थाकरीता आहेत. कृषि महोत्सवामध्ये कृषि प्रदर्शन, परिसंवाद चर्चासत्र, खरेदीदार विक्रेता संमेल्लन, गृहउपयोगी वस्तुंचे दालन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन, शेतकरी सन्मान समारंभ होणार आहे. तसेच कृषि विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्र प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण, परिसंवाद या निमित्ताने होणार आहे.कृषि महोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण गजेंद्र रेडा, कोसा खिलार, उस्मानाबादी शेळी, गिर गाई इत्यादी राहणार असून या महोत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे दैनंदिन सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक शेतीविषयक तज्ञांचे परीसंवाद व चर्चासत्रांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे रोज सायंकाळी 5 ते 9 आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलाविष्कार, शालेय विद्यार्थीचे विविध गुणदर्शन,गायन, नृत्य,खेळ पैठणीचा,महाराष्ट्राची लोककला इ.चा समावेश करण्यात आलेला आहे.

या महोत्सवात कृषि संलग्न विभागांचाही सक्रीय सहभाग असणार आहे याकरिता कृषि विद्यापीठे, महसुल विभाग, जिल्हा परीषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजीक वनीकरण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, जलसंधारण विभाग, वन विभाग, महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ, महाबीज, साखर, भूजल सर्वेक्षण, सहकार, महिला बाल कल्याण विकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग इ. माध्यामातून शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा आणि चर्चासत्राचा लाभ घेता येणार आहे.

कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्राच्या समन्वयाने विविध पिके जसे की, सोयाबीन, हरभरा, फळबाग लागवड आदी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत तसेच पशुपालन व दुग्ध उत्पादन, कृषि प्रक्रिया रेशीम लागवड, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, द्राक्ष व ऊस शेती उत्पादन व व्यवस्थापन इ. चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विभागाअंर्तगत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, स्मार्ट, पंजाबराव देशमुख जैविक मिशन, माहिती विभाग, शेतकरी मासिक, पीएमएफएमई, कृषि यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञान, आदर्श पाणलोट क्षेत्र मॉडेल, पोक्रामार्फत वातावरण अनुकूल तंत्रज्ञान अवलंबलेले आदर्शगाव, सिंचन पद्धती, पोकरा आदींना स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध विषयांवरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तज्ञ येणार आहेत.तरी 18 ते 22 या दरम्यान आयेाजीत केलेल्या श्री.तुळजाभवानी कृषि महोत्सवाला जिल्हयातील शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.


 
Top