धाराशिव (प्रतिनिधी)-शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिक्षणमहर्षी स्व. आमदार वसंतराव काळे यांचा दि. 2 फेब्रुवारी हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पळसप, ता,. जि. धाराशिव येथे एक दिवसाचे मराठवाडास्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन सुप्रसिध्द साहित्यिका अंजली धानोकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री तानाजी सावंत, क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीचे उद्घाटन प्रा. डॉ. संजय कोरेकर यांच्या होणार आहे. सकाळी 10 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य अशोकराव नाईकवाडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच 10.15 वा. जेष्ठ चित्रकार प्रकाश घादगिणे व मंगेश निपाणीकर यांच्या कलाकृतींच्या चित्र प्रदर्शन्ाचे उद्घाटन पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनामध्ये कृषी व कृषीपुरक व्यवसाय- काळाची गरज या विषयावर दुपारी 1.30 ते 3 या दरम्यान परिसंवाद होणार आहे. कृषीमुल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. माजी कुलगुरू प्राचार्य अशोक ढवण, प्रा. डॉ. विजय भामरे, प्रगतशील शेतकरी, हिंगोली रामेश्वर मांडगे यांचा परिसंवादामध्ये सहभाग आहे. दुपारी 3 ते 4.30 यावेळेमध्ये गेणु शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न होणार आहे. सायं. 4.30 ते 6 यावेळेत कविसंमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. कवि संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. महेश मोरे हे भुषविणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तरी मराठवाड्यातील साहित्यिक, रसिक, शिक्षक, प्राध्यापक, नागरिक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे, प्राचार्या शुभांगी काळे, प्राचार्य अनिल काळे व समस्त पळसप ग्रामस्त यांच्यावतीने करण्यात येत आहे.


 
Top