धाराशिव (प्रतिनिधी)-येत्या सर्व निवडणुकीत आरक्षणवाद्यांनाच मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबडेकर यांनी केले. धाराशिव येथील आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. 

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार आंबेडकर बोलत होते. यावेळी ओबीसी आरक्षण जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, कार्याध्यक्ष टी. पी.मुंडे, उपाध्यक्ष चंद्रकांत बावकर, लोणार समाजाचे नेते सुदर्शन भेगडे, आग्री कोळी समाजाचे मुंबईचे नेते जे. डी. तांडेल, रामोशी समाजाचे नेते अनंता चव्हाण आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

येत्या लोकसभा निवडणुकीत किमान 12 ओबीसींना उमेदवारी देणारा पक्षच आपला माना. आंबेडकर पुढे म्हणाले की, पुर्वी सत्तेचे केंद्र मंदिर होते. मात्र आता संसद व विधानसभा सत्तेचे केंद्र बनले आहे. यामुळे आता हे आपल्या ताब्यात असण्याची गरज आहे. आरक्षण तर आपल्याला वाचवायचे आहेच परंतु, त्यातून आपल्याला विकास साध्य करायचा आहे. यासाठी आपलाच आमदार व खासदार देण्याची गरज आहे. त्यामुळे जो राजकीय पक्ष आपल्याला उमेदवारी देईल, तोच आपला पक्ष असणार आहे. या पुढील लढाई आरक्षणवादी व आरक्षणविरोधकांमध्ये असणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या यादीत सध्या ओबीसी, 12 बलुतेदार, धनगर, माळी आदी जातीचे खासदार दिसत नाहीत. यामुळे आता ओबीसीं व अन्य जातींच्या लोकांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आंधळेपणाने मतदान न करता डोळसपणे मतदान करण्याची गरज आहे असे आंबेडकर यांनी आवाहन केले.

तर प्रकाश शेंडगे यांनी ओबीसींच्या ताटात माती कालवण्याचे पाप करू नये. ओबीसी कुणबी समाजाच्या वाट्याला आलेले भोग भोगावेत आणि मगच जरांगेने आरक्षणाची मागणी करावी असे आवाहन केले. यावेळी प्रा. टी. पी. मुंडे, चंद्रकांत बावकर आदींची भाषणे झाली. धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यावर सभा ठेवल्यामुळे या सभेमुळे शहरातील एकंदर वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षा वाहतुक सप्ताह चालू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा चालू होती. 


 
Top