धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व येथील युवक युवतींना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी ता. तुळजापूर येथे एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी केली होती. यास यश मिळाले असून उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तामलवाडीला नवीन एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे.

सोलापूर पासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील गाव तसेच प्रस्तावित सूरत चेन्नई महामार्गासह अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून येथील उद्योग वाढीला चालना देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी उभारण्याची आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सकारात्मकता दर्शवत जागेची पाहणी करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने एमआयडीसीचे क्षेत्रिय अधिकारी, लातूर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी तामलवाडी येथे येऊन जागेची पाहणी करून अहवाल शासनास सादर केला होता. येथे जवळपास 400 एकर पेक्षा जास्त जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होऊ शकते. आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्याजकांना प्रोत्साहनपर सवलती मिळू शकतात. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक जमीन देण्यास येथील शेतकरी तयार असून अनेक उद्योजकांनी देखील येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे.

या सर्व बाबींचा विचारात घेता उद्योग विभागाच्या झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसा पूर्वी सोलापूर येथील उद्योजकांसमवेत घेतलेल्या बैठकी मध्ये अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती, यामुळे येथे जलद गतीने गुंतवणूक होवून जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. उच्चाधिकार समितीने दिलेल्या मंजूरी बद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्यासह महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.


 
Top