परंडा (प्रतिनिधी) -लग्नाचे आमिष दाखवून सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबी पोलीस स्टेशनमधे दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाकलेटीबाई भोसले व अन्य आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींनी विजय पाटील यांंना तुमच्या पुतण्याशी आमच्या मुलीचे लग्न लावून देतो असे आमिष दाखवले. त्याबदल्यात सुमारे एक लाख रुपये व दोन तोळे सोने द्यावे लागेल अशी अट टाकली.
सदरचे लग्न तालुक्यातील ताकमोडवाडी येथे दि.7 डिसेंबर रोजी करण्याचे ठरले होते.लग्नाच्या आधी मुलीच्या नातेवाईकांना सुमारे एक लाख रुपये व सोन्याचे दागिने देण्यात आले.त्यानंतर लग्न लावून न देता आरोपींनी लग्नासाठी आलेल्या लोकांच्या डोळ्यात तिखट टाकून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी अंबी पोलीस स्टेशनमधे फिर्याद दिली. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.