धाराशिव (प्रतिनिधी)- हजारो वर्षापासून जमिनीच्या पोटात दडलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा आता याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून 13 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
सदर कामांतर्गत कोट क्षेत्र सभोवताली संरक्षक भिंत बांधणे, शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे, प्राप्त अवशेष प्रदर्शित करणे, स्तर विज्ञान च्या माध्यमातून पर्यटक अभ्यासकांकरिता या परिसरात कशा प्रकारे उत्खनन कार्य केले जातात, प्रत्येक संस्कृतीचे स्थर कशा प्रकारचे विकसित होतात याबाबतची माहिती देखाव्या स्वरूपात पर्यटकांना अभ्यासकांना देणे तसेच परिसरात बाग बगीचा विकसित करणे, पर्यटकांकरिता सोयी सुविधा देणे इत्यादी कामे प्रस्तावित असल्याची माहिती आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
पर्यटन विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्यासह 12 तज्ञांच्या पथकाने सन 2015 मध्ये या टेकडीवर उत्खननास सुरुवात केली होती. येथे पाण्याचा आड, हौद, घराच्या पायऱ्या, नक्षीदार दागिने असे अवशेष उत्खननात सापडले आहेत. त्यासाठीच कोट टेकडी परिसर एक उत्खनणाची कार्यशाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्तरविज्ञान शास्त्राचा अभ्यास केला जाणार आहे. सुमारे एक एकर क्षेत्रावर टेंसाईल छत टाकला जाणार आहे. संरक्षक भिंत व त्यालागत प्रशस्त उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही साईट एक पर्वणी ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
