धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 22 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महिलांसाठी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन धाराशिव येथे करण्यात आले.

मेळाव्याचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मागील नऊ वर्षांमध्ये जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे झाले आहे. भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू आहे.यासाठी समाजातील शेवटचा घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे.याकरीताच विविध रोजगार निर्मिती योजना व विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अधिकचे प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास 1500 युवक-युवतींना व्यवसायांकरीता कर्ज देण्यात आले आहे.विश्वकर्मा योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारासह इतर सहा व्यवसायांना, व्यवसाय वृद्धीसाठी पहिल्या टप्प्यात रुपये 1 लाखांपर्यंत अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. महिलांसाठीच्या योजनांवर विशेष भर दिला आहे.घरकुल,उज्वला गॅस, शौचालय,पिण्याचे पाणी याकरीता विविध योजना सुरू केल्या आहेत.  महिलांसाठी कृषी ड्रोन प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यात येत आहे.महिलांनी रोजगार व स्वयंरोजगारासाठी पूर्ण ताकतीने व हिमतीने पुढाकार घ्यावा.आम्ही देखील तेवढ्याच ताकतीने यासाठी मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.तसेच पारधी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व या समाजाच्या महिला व युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे त्यांनी आभार मानले.जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या रोजगार मेळाव्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर,लातूर,धाराशिव येथील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मेळाव्यासाठी 20 उद्योजकांनी त्यांच्याकडील जवळपास 350 पदासांठी मुलाखती घेतल्या. यासाठी 690 नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या व त्यापैकी 298 महिला उमेदवारांची प्राथमिकरित्या निवड केली.तसेच स्वंयरोजगारासाठी विविध 15 महामंळाकडे 526 उमेदवारांनी नोंदणी केली.

याप्रसंगी जिल्हा अभियान संचालक (उमेद) प्रांजल शिंदे, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव,जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.जावळीकर,तहसीलदार (परिविक्षाधिन) निलेश काकडे,नायब तहसीलदार संदेश भोसले,उदयोजक संजय देशमाने,महिला आर्थीक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, एमसीईडीचे पांडुरंग मोरे,जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी सोळंके,रिजवान कपूर व शासकीय आयटीआय संस्थेमधील शिल्पनिदेशक,कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी व महिला उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोबडे यांनी केले.प्रास्ताविक कौशल्य विकास सहायक आयुक्त संजय गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार समाधान जोगदंड यांनी मानले. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, शासकीय आयटीआय, एमएसआरएलएम व जिल्हा उद्योग केंद्राने सहकार्य केले.


 
Top