धाराशिव (प्रतिनिधी)- विविध राज्यात अपयशी ठरलेल्या व कसलाही जनाधार नसलेल्या एनडीएला इतर देशात भंगारात टाकलेले ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतल्यामुळेच यश मिळत आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीला दिवसेंदिवस धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथे एनडीएला कसल्याही प्रकारचा जनाधार उरलेला नसताना व जनतेमध्ये प्रचंड असंतोष असताना ही केवळ ईव्हीएम मशीनमुळेच तेथे सत्ता आली. जगातील इतर देशात कुठेही ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नसल्यामुळे भाजप वगळता इतर सर्व पक्ष व भारतीय जनतेनेही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वारंवार ईव्हीएम मशीनद्वारे कोणतीही निवडणूक न घेण्याची मागणी केलेली असतानाही भाजपा केवळ आपल्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचे टाळत असल्याचा आरोपही ॲड भोसले यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप करता येत नसेल तर मग ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशीन जोडून पावती मिळविण्याचे काय कारण? तसेच ईव्हीएम मशीनमध्ये आपल्या इच्छेनुसार अपेक्षित बदल करता येत असल्यामुळे अनेक देश- परदेशातील तज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे .ज्या राष्ट्रांमध्ये ईव्हीएम मशीनची निर्मिती केली जाते त्या राष्ट्रांमध्येही ईव्हीएम मशीनद्वारे तेथील कोणत्याही निवडणुकीचे मतदान घेतले जात नाही .मग आपल्या देशात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवालही ॲड. भोसले यांनी केला आहे.