भूम (प्रतिनिधी)-“अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त“ च्या जयघोषात कसबा येथील श्री केशवराव मंदिर व बारबोले यांच्या दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठया उत्साहात 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. 

केशवराव मंदिरात ह.भ.प. शोभाताई बारगजे यांचे श्री दत्त जन्मावर आधारित कीर्तन पार पडले. दुपारी 12 वाजता फुले उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला. संस्थानचे श्रीपाद इनामदार यांनी विशेष परिश्रम घेवून श्री दत्त जयंती सोहळा यशस्वी पार पाडला. तसेच बारबोले यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री दत्त मंदिरात कसबा येथील भजनी मंडळाचे भजन होऊन दुपारी 12 वाजता फुले उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच भूम येथील एस.टी. डेपो येथील श्री दत्त मंदिरात गेल्या 30 वर्षांपासून चालक व वाहक यांच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा साजरा केला जातो. यंदाही त्याच उत्साहात हुरकुडे यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर पेपर विक्रेते अरविंद शिंदे यांच्या वतीने साबुदाणा खिचडी व केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली.


 
Top