तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील  मराठा समाजाला ओबीसी  मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि. 1 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी जागतिक नौदल दिनाचे औचित्य साधून गावातील माजी सैनिकांनी साखळी उपोषणांस पाठिंबा दिला. सुरुवातीस माजी सैनिक महादेव वडणे यांनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी सुभेदार माजी सैनिक  लक्ष्मण वडणे,नाइक सुभेदार मोतीराम वडणे, अंगद वडणे,जनार्धन वडणे, हनुमंत वडणे, प्रकाश वडणे,राजाराम वडणे आदी माजी सैनिकां सह गावातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण माळुंब्रा गाव अग्रेसर असून श्री मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती त्यावेळी माळुंब्रा व पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी सांयकाळी गनिमी काव्याने धुळे-सोलापूर महामार्ग तीन तास रोखून धरला होता.याची दखल श्री जरांगे पाटील यांनी घेतली व मी तुमच्या आग्रहाखातर पाणी घेत आहे तुम्ही रास्ता रोको थांबवा असे आवाहन केले आणि तद्नंतर हे आंदोलन थांबले होते, या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.

श्री जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या टप्प्यातील आंदोलन सुरू असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावात साखळी उपोषण सुरू आहे. हे साखळी उपोषण अत्यन्त शांतपणे सुरू असून उल्लेखनीय म्हणजे या ठिकाणी प्रवचन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील भजनी मंडळ भजनाचा जागर करीत आहेत.विशेष म्हणजे या आंदोलनाला गावातील ओबीसी बांधव देखील पाठिंबा देत आहेत.


 
Top