धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त मोती राम, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्री.मनोज कुमार आणि नीती आयोगाचे संशोधन अधिकारी श्री.शिवचरण मीणा या तीन सदस्यीय पथकाने दि. 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबतची माहिती घेतली. मोती राम म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास यंत्रणांनी नियोजनातून काम करावे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळीच करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे पुढील वर्षी पीक कर्ज सहजपणे उपलब्ध करून देता येईल असे सांगितले.
गुप्ता यावेळी म्हणाले, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाण्याचे स्त्रोत शोधून पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विविध यंत्रणांच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे भूगर्भात संचयन करून भूजल पातळी वाढविण्यास मदत होत आहे. अटल भूजल योजना जिल्ह्यातील 55 गावात सुरू आहे. सभेला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.गौरीशंकर हुलसुरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रंजन दास, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता ए. एन. मदने,विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी.जी राठोड,ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता आर. एम.ढवळे,वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मेघना शिंदे,उपविभागीय अधिकारी योगेश खारमाटे व गणेश पवार, उपकार्यकारी अभियंता (जलसंधारण) एस.एन. माने,उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, शुक्राचार्य भोसले, विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक हरिओम सोळंके व कृषी उपसंचालक श्री.काशीद यांची यावेळी उपस्थिती होती.
