धाराशिव (प्रतिनिधी)-शहरात उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांच्या रुग्णालयाची इमारत देशातील नामांकित वास्तुविशारद, वास्तुशास्त्र संस्थांची बांधकाम कल्पना स्पर्धा घेऊन उभारली जाणार आहे. रू 430 कोटींच्या या कामांची  'आईडिया कॉम्पिटीशन' निविदा काढण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातूनच इमारतीच्या डिझाईनची निवड केली जाणार आहे. राज्यातच नव्हे तर देशातील सर्वोत्कृष्ट अशी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न 3 वर्षांपासून प्रलंबित होता.धाराशिव शहरात जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी असा आग्रह आ.पाटील यांनी धरला होता त्यास प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जागेची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर जागा तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले होते.

जागा हस्तांतरण तातडीने मार्गी लागावे यासाठी आपला प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा सुरू होता व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत सदर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला होता तसेच सदर जागा ही राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाला लागून असल्याने नियोजित इमारत रुग्ण, विद्यार्थी व नातेवाईकांसाठी अतिशय सोयीस्कर राहणार असून यामुळे शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे.

याच जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांच्या रूग्णालयासाठी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या इमारतीची आधुनिक अशी संभाव्य रचना निश्चित करण्यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद आणि वास्तुशास्त्र संस्थांची बांधकाम कल्पना स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतूनच इमारतीच्या बांधकामाचे सर्वोत्तम असे डिझाईन्स जानेवारी अखेर निवडण्यात येणार असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.

आपल्या संकल्पनेतील वैद्यकीय संकुल निर्मितीचा हा पहिला टप्पा असून पुढील काळात  430 खाटांच्या रुग्णालयाची क्षमता वाढवून 1 हजार खाटांचे रुग्णालय करण्याचे नियोजन असून राज्यातील महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने वैद्यकीय शिक्षणासाठी पूरक असणाऱ्या सर्व विद्याशाखांचा अंतर्भाव असणारे भव्य वैद्यकीय संकुल देखील  साकारण्यात येईल असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 
Top