धाराशिव (प्रतिनिधी)-मध्य प्रदेशातील भोपाळ येथे दि. 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या 66 व्या राष्ट्रीय चॅम्पीयनशिप नेमबाजी स्पर्धेत धाराशिव येथील चेतन सपकाळ याने 25 मीटर स्पोर्टस्‌‍ पिस्टल प्रकारामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमासह (570 गुणासह) सुवर्णपदक, 25 मीटर रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्णपदक तर 25 मीटर स्टॅण्डर्ड पिस्टलमध्ये एक रौप्य अशा एकुण तीन पदाकांची कमाई केली आहे.

चेतन सपकाळ याने गतवर्षी झालेल्या 65 व्या राष्ट्रीय चॅम्पीयनशिप स्पर्धेमध्ये देखील तीन पदकांची कमाई केली होती. चेतन सपकाळ याने आजअखेर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत एकुण सहा पदक प्राप्त केली आहेत. जानेवारी 2024 मध्ये (दिल्ली) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेकरिता त्याची निवड झाली आहे. नेमबाजी क्रिडा प्रकारामध्ये सिनिअर गटात पदक मिळविणारा चेतन सपकाळ हा मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील एकमेव खेळाडु असून तो पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये गेली सात वर्षापासून कॅप्टन सी. के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. 

हा गुणी खेळाडु अत्यंत सामान्य कुटुंबामधून राष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे. नेमबाजी हा क्रीडा प्रकार अत्यंत खर्चिक असल्याने, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्याकरीता आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. विशेषतः चेतन सपकाळ हा पूर्णतः दिव्यांग असून तो सर्वसाधारण (नॉर्मल) गटातून यशस्वी वाटचाल करीत आहे. धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी  या गुणी खेळाडूस आर्थिक मदत करुन क्रीडा क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची संधी देण्याची गरज आहे.


 
Top