धाराशिव (प्रतिनिधी)-देशात साखरेचे दर वाढतील यामुळे ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उस उत्पादक शेतकरी व कारखानदारांच्या. मागणी मुळे उठवण्यात आली, त्याच धर्तीवर कांद्याचे भाव वाढतील, यामुळे केलेली निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून मागे घ्यावी, अशी आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री ना. पीयूषजी गोयल यांच्या कडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यात आधी अल्प पर्जन्यमान व नंतर झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाला आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे बाजारातील कांद्याचे भाव कोसळले आहेत. गेल्या वर्षी अचानक कोसळलेले भाव व यावर्षी नुकताच झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात असताना केंद्र सरकारच्या या निर्णयाने फारच खचून गेला आहे. देशातील साखरेच्या उत्पन्नात घट होवून भाव वाढतील यामुळे सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. मात्र शेतकरी व कारखानदारांचे हित विचारात घेवून ही बंदी उठविण्यात आली. त्याच धर्तीवर कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवर घातलेली बंदी रद्द करून निर्यात पूर्ववत सुरु ठेवण्याची आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
