भूम (प्रतिनिधी)-'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' 2023 , वर्षीच्या मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी कवयित्री प्रा. अलका सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक कवयित्री असून, कृतीशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सपकाळ यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, वंचित महिला यांच्या वेदनांना त्या शब्दरुप देत समाजासमोर घेउन आल्यात, बंधुता अन समन्वयवादी विचारांच्या पुरस्कर्त्या असलेल्या सपकाळ यांना संत साहित्यातही विशेष रुची आहे.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन आयोजित समता वारीचे हे 6 वे वर्षे आहे. सोमवार 1 जानेवारी 2024 श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून शुक्रवार 12 जानेवारी 2023 रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय जन्मभूमी देहुगाव येथे सदरील समता वारीचा समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर, नगर, पुणे आदी 8 जिल्ह्यातुन 1350 किलोमीटर प्रवास करणार आहे. समाजातील वाढत जाणारी दरी, विषमता, जातीयवाद, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयांवर सकारात्मक प्रबोधन करत समाज जागृती करण्यात येणार आहे. वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होउन समाजात बंधुभाव वाढीस लागावा यासाठी व समता, मानवता व बंधुभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचण्यासाठी ही वारी निघत आहे.
