धाराशिव (प्रतिनिधी)- लोकांनी संकुचित राजकारण दूर करून विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आपापसातील हेवेदावे, मत्सर, द्वेष यांमुळे विकास कार्यात अडथळे निर्माण होतात. असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी केले. प्रा. डॉ. येवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीने धाराशिव येथील विद्यापीठ उपपरिसरात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉ. येवले बोलत होते.

यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित आदि व्यासपीठावर उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ. येवले म्हणाले की, मराठवाडा ही संताची भूमी आहे. या भूमीची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. समाज विद्यापीठाशी जोडलेला आहे. विद्यापीठात आधारभूत संरचना विकसित केली. विद्यापीठ प्रवेश द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रतिष्ठापना, दोन कोविड लॅबची उभारणी, विश्रामगृह, उपहारगृह इमारत, विज्ञान इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्याचे कार्य पुर्ण करून शैक्षणिक विभागांना पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली. गुणवत्तापूर्ण शिक्षण व संशोधनासाठी मार्गदर्शन केले व पाठबळ दिले. समतोल विकास साधण्याचे प्रयत्न केला. त्यामुळे आपण समाधानी असून, हे यश आल्या सर्वांचे आहे असेही डॉ. येवले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्यशास्त्र व लोककला विभागातील डॉ. गणेश शिंदे यांनी मानले. जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्र कुलकर्णी यांनी मान्यवरांचे व कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 
Top