धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यापीठामध्ये काही मोजके शैक्षणिक गुणवत्ता राखणारे, शिक्षणाचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखणारे जे महाविद्यालय आहेत त्यापैकी रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने असलेले हे महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे कितीही वेळा आले तरीही मन भरत नाही. असे कुलगुरू प्रा. डॉ.प्रमोद येवले म्हणाले.  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांचा कार्य गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले बोलत होते.

डॉ. येवले पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे महाविद्यालय करत आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचा मी आभारी आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हा माझा सत्कार म्हणजे मराठवाड्याने दिलेली प्रेमाची पावती आहे असे ही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, प्रोफेसर डॉ.प्रमोद येवले यांच्यासारखे शिस्तप्रिय कुलगुरू त्यांनी विद्यापीठाला शिस्त लावली, त्याचबरोबर सलग्नित महाविद्यालयाला देखील शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. कुलगुरू साहेबांचे प्रत्येक काम कायद्याच्या चौकटीत बसणारे असायचे. असे कार्य कुशल आणि शिस्तप्रिय कुलगुरू यांचा सत्कार आमच्या महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने होतो आहे हे आमचे सदभाग्य आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील हे होते. त्यांनी आपल्या मनोगत नवीन शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. व कुलगुरु यांना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.अंकुश कदम हे उपस्थित होते. यांचा देखील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील संचालक डॉ. दीक्षित, डॉ. रमेश दापके व विविध महाविद्यालयातील प्राचार्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले.


 
Top